Ad will apear here
Next
समृद्ध चामराजनगरची सैर
मुदुकुठोरे
तुम्हाला पक्ष्यांची किलबिल, वाघाची डरकाळी ऐकायची आहे? हत्तीचे कळप, सदाहरित वृक्ष, तसेच साग, ऐन, शिसम चंदनाची झाडे... अशी भरपूर वनसंपदा, गवताळ प्रदेश, वनचर यांनी समृद्ध असा प्रदेश पाहायचा आहे? मग चला कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात. ‘करू या देशाटन’मध्ये या वेळी चामराजनगरची सैर.
........
कर्नाटकमधील चामराजनगर हा अभयारण्यांचा, तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा असलेला जिल्हा आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात हा जिल्हा आहे. म्हैसूरहून उटीला जाताना मार्गावर असलेले बांदीपूर आपल्याला अभयारण्य पाहता येते; मात्र त्यासाठी जंगल सफारी करावी लागेल. याच भागात असलेल्या निबिड अरण्यात एकेकाळी चंदन व हस्तिदंत तस्कर वीरप्पन याची दहशत होती. वीरप्पनने १२० लोकांची हत्या केली होती व हस्तिदंतासाठी दोन हजार हत्ती मारले होते. अब्जावधी रुपयांच्या चंदनाची तस्करी त्याने केली होती.  

चामराजनगर
  
चामराजनगरला या गावाला पूर्वी श्रीअरीकोट्टरा असे म्हणत. म्हैसूरचे राजे चामराज वाडियार नववे यांचा जन्म येथे झाला. त्यावरून चामराजनगर हे नाव रूढ झाले. येथे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, बौद्ध असे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात. येथे अनेक हिंदू मंदिरे, १५ मशिदी, पाच चर्च, दोन जैन मंदिरे व दोन बौद्ध विहार आहेत. तसेच आदिवासी लोकसंख्याही भरपूर आहे. तमिळभाषकही भरपूर आहेत. चामराजनगर व आसपासच्या भागात रेशीम हँडलूम उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. रेशीम व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालतो.

बांदीपूरबांदीपूर : जणू काही फक्त प्राण्यांचेच राज्य असे म्हणता येईल, असे बांदीपूर अभयारण्य आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकारामांच्या सुंदर काव्याची प्रचीती येथे घेता येते. निसर्गातील अध्यात्म वास्तवतेने येथे अनुभवता येते. विविध वनचरांचे अस्तित्व असलेले ८७४ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेले हे अभयारण्य असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प येथे आहे. (वाघांची संख्या २२१) भारतातील सर्वाधिक हत्ती येथे आहेत. मुद्देमलाई, नागरहोळे ही अभयारण्येही बांदीपूरला लागून आहेत. या अभयारण्यातून उटीला जाणारा हमरस्ता असल्याने अनेक प्राणी अपघातांमध्ये मरण पावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद असते. भारतातील २७ हजार ३१२पैकी ६०४९ हत्ती कर्नाटकात आहेत. त्या खालोखाल ५७१९ हत्ती आसामात आहेत. 

विविध प्रकारची हरणे, २०० प्रकारचे पक्षी, मधमाश्या खाणारे पक्षी, गिधाडे, रंगीबेरंगी कबुतरे, जंगली कुत्री, लांडगे, तरस, अस्वले, कोल्हे, मुंगसे, शेकरू, धिप्पाड गवे, साळिंदर, माकडे, वानरे, मगरी, सरडे, अनेक प्रकारचे विषारी-बिनविषारी सर्प, विविध रंगांची फुलपाखरे हेही येथील खास आकर्षण आहे.

गोपालस्वामी पर्वत
गोपालस्वामी पर्वत : वर्षभर दाट धुक्याची ओढणी घेऊन दिमाखाने उभे असलेले हे ४७५६ फूट उंचीचे शिखर बांदीपूर अभयारण्यामध्ये आहे. वेणुगोपालस्वामी (भगवान कृष्ण) यांचे मंदिर येथे आहे. इ. स. १३१५च्या सुमारास हे मंदिर चोळ राजा बल्लाळ यांनी बांधले. नंतरच्या राजांनी या देवळाला ऊर्जितावस्था दिली. बासरी वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती येथे असून, बाजूला दशावतारही कोरलेले आहेत.

बिलिगिरीरंगा पर्वत
बिलिगिरीरंगा पर्वत : तमिळनाडूच्या सीमेवर पश्चिम घाटात हे व्याघ्र प्रकल्पांतर्गत अभयारण्य आहे. (बीआर हिल्स) ५३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील हे अभयारण्य हत्ती व वाघांचे भारतातील मोठे वसतिस्थान समजले जाते. बिलिगिरी म्हणजे पांढरा पर्वत अशीही ओळख आहे वर्षातील बऱ्याच वेळा याची शिखरे श्वेत मेघांनी झाकलेली असतात. त्यामुळे श्वेत पर्वत असे म्हणतात. येथे अस्वले, हत्ती, बिबटे, वाघ, विविध हरणे, माकडे, शेकरू असे अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात

माले महादेश्वर हिल्समाले महादेश्वर हिल्स : चामराजनगर जिल्ह्यातील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. माले महादेश्वरचे देऊळ इ. स. १५००मध्ये जमीनदार गौडा बंधूंनी बांधले. १५५ एकर क्षेत्रावर या मंदिराचे क्षेत्र विस्तारले आहे. सपाट रस्ते आणि टाइलयुक्त पायथ्यासह ही विकसित होणारी टेकडी आहे. पर्यटकांची येथे अल्प दरात राहण्याची व्यवस्था करण्यात येते. किरकोळ आणि पूजा वस्तूंच्या विक्रीसाठी बरीच दुकाने येथे आहेत. सुमारे ५० वर्षांपूर्वी या ठिकाणी कोणतीही रस्ते सुविधा नव्हती. पूर्वी लोक चालत येत असत. सध्या कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधील रस्ते जोडलेले आहेत. दररोज या मार्गावर १००हून जास्त बस चालू आहेत. या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अनेक ठिकाणे आहेत.

कनकगिरी
कनकगिरी : कनकगिरी टेकडीचे वर्णन प्राचीन इतिहासकारांनी व लेखकांनी नाकोपामा शैला असे केले आहे. याचा अर्थ स्वर्गाच्या रूपातील पर्वत असाही आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्र आहे. येथे जंगलात चंदनाची झाडे व इतरही किमती लाकडांची झाडे दिसून येतात. येथे प्राचीन गुंफा शिलालेख आढळतात.

के. गुडीके. गुडी : हे गिरिस्थान ३५०० फूट उंचीवर असून, बीआर हिल्स वन्यजीव अभयारण्य क्षेत्रामध्ये येते. बीआर हिल्स हे ठिकाण विविध जंगली प्राणी आणि पक्ष्यांसाठी स्वर्ग मानले जाते. या ठिकाणी म्हैसूरच्या राजांच्या शिकारीच्या छंदासाठी खास बंगला बांधण्यात आला आहे. येथे अनेक रिसॉर्टस् आहेत. तसेच घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. येथून जंगल सफारीचीही व्यवस्था आहे.

मुदुकुठोरेमुदुकुठोरे : हे धार्मिक ठिकाण भगवान मल्लिकार्जुन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान एका आठवड्यासाठी एक मोठा उत्सव आयोजित केला जातो. येथे शेतकरी बाजार असून, शेतीसाठी आवश्यक गुरे आणि अवजारे, तसेच इतर वस्तूंची विक्री येथे केली जाते. तळकदु येथे शिव मंदिरे असून, ते विशेषतः वैद्यनाथेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

चन्नाप्पानापुरा : येथे दोन सुंदर मंदिरे, टेकडीवर आहेत. एक वीरभद्रस्वामी मंदिर, तर दुसरे जडेरुद्रस्वामी मंदिर. हे ठिकाण चामराजनगरपासून १० किलोमीटरवर आहे.

बारा चुक्की : कावेरी नदीवर मंड्या आणि चामराजनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर शिवसममुद्र फॉल्सजवळच बारा चुक्की आणि गंगा चुक्की हे दोन अतिशय देखणे धबधबे आहेत. अतिशय खडकाळ अशा डोंगर उतरणीवर हे धबधबे आहेत.

हुलिगिना मराडीहुलिगिना मराडी : याला हुलिगद्री, दक्षिणशेषाद्री व व्याघ्राचल असेही म्हणतात. भगवान श्रीनिवास मंदिरामुळे हे प्रसिद्ध आहे. श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते, असे समजले जाते. तसेच पांडव व अगस्त्य ऋषीही येथे राहिले होते, असा स्थानिकांचा समज आहे.

चामराजनगरच्या आसपास
होनगेकल धबधबा तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात असून, तो चामराजनगर व धर्मपुरी जिल्ह्याच्या सीमेवर कावेरी नदीवर आहे. उटी हे थंड हवेचे ठिकाणही जवळ आहे.

कनकगिरी
कसे जायचे चामराजनगरला?

म्हैसूर राज्य महामार्गावर चामराजनगर वसलेले आहे. म्हैसूरहून रेल्वेने येथे येता येते. जवळचा विमानतळ म्हैसूर. येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मे. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. बांदीपूर येथे, तसेच चामराजनगर येथे राहण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 

बारा चुक्की

(चामराजनगरचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMHBT
Similar Posts
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...
सफर म्हैसूरची – भाग दोन (वृंदावन) ‘करू या देशाटन’ या सदरात कर्नाटकातील म्हैसूर या निसर्गरम्य जिल्ह्याची सफर आपण करतो आहोत. म्हैसूर सफरीच्या दुसऱ्या भागात आज फेरफटका वृंदावनचा...
सहल तुमकुरू जिल्ह्याची... आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय पाषाण कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात आहे. ग्रॅनाइटचे निरनिराळे प्रकार या भागात पाहायला मिळतात. या पाषाणातही अनेक वनस्पती उगवतात. त्यामुळे वेगळेच सौंदर्य बघायला मिळते. पदभ्रमण करणाऱ्यांसाठी हा स्वर्गच असून, भू-शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचे ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज सहल तुमकुरू जिल्ह्याची
वास्तुकलेचे माहेरघर – विजापूर उत्तर कर्नाटकातील विजापूर हे दक्षिण भारतातील वास्तुकलेचे माहेरघर समजले जाते. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात या शहरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language